ओशो वाणी भाग 29.

 मृत्यूची घटना अतिशय रहस्यमय आहे, आणि त्याच प्रमाणे आत्महत्येची घटनाही.पृष्ठभागावरून हे निश्चित करू नका की आत्महत्या काय आहे?अनेक गोष्टी असू शकतात.मला स्वतःला असे वाटते की जे लोक आत्महत्या करतात हे या जगातील खूप संवेदनशील, खूप प्रतिभावान लोक आहेत.त्यांच्या संवेदनशील आणि प्रतिभावान असल्यामुळे त्यांचा या विक्षिप्त जगाशी ताळमेळ बसू शकत नाही.समाज विक्षिप्त आहे,तो विक्षिप्त पायावर आधारलेला आहे.त्याचा सर्व इतिहास वेडेपणा, हिंसा, युद्ध आणि विध्वंसाचा आहे.कुणी म्हणते की माझा देश जगातील महानतम देश आहे,आता ही विक्षिप्तता आहे.कुणी म्हणतो की माझा धर्म जगातील महानतम आणि सर्वश्रेष्ठ धर्म आहे, आता ही विक्षिप्तता आहे आणि ही विक्षिप्तता रक्त मास मज्जा या पर्यंत जाऊन पोहोचली आहे.आणि लोक खूप खूप निस्तेज आणि संवेदनाहीन झाले आहेत.त्यांना व्हावे लागते, नाहीतर जगणे मुश्किल होऊन जाते.या चारी बाजूंना पसरलेल्या संवेदनाहीन समाजात तुम्हालाही संवेदनाहीन होऊन जावे लागते.अन्यथा तुम्ही प्रवाहाच्या बाहेर जाऊ लागता.जर तुम्ही समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊ लागलात तर समाज समजतो की तुम्ही वेडे झाला आहात .खरे तर समाज वेडा आहे ,पण तुमचा त्याच्याशी ताळमेळ बसत नसला की तो तुम्हाला वेडे ठरवतो.त्यामुळे एक तर तुम्हाला वेडे व्हावे लागेल किंवा समाजाच्या बाहेर व्हावे  लागेल.ही आत्महत्या आहे.जीवन असहनीय होऊन जाते.चारी बाजूंना ज्या लोकांनी तुम्ही घेरलेले आहात त्या लोकांशी तुमचा ताळमेळ बसू शकत नाही.आणि ते सगळे विक्षिप्त आहेत.जर तुम्हाला वेड्यांच्या इस्पितळात फेकले गेले तर तुम्ही काय कराल?या विकसित जगात जर तुम्ही समजदार, संवेदनशील, प्रतिभावान असाल तर एक तर तुम्ही वेडे व्हाल किंवा तुम्ही आत्महत्या कराल,किंवा तुम्ही ध्यान करायला लागाल.अजून करण्यासारखे काय आहे? पूर्वेकडे आत्महत्येचे प्रमाण तेवढे नाही, कारण आपल्याकडे ध्यानाचा विकल्प आहे .आणि आत्महत्येच्या घटना सतत वाढत राहतील, कारण समज वाढत चालली आहे संवेदनशीलता वाढत चालली आहेआणि समाज कुंद आहे.आणि समाज कुठल्या समजदार जगामधून येत नाही.तर मग काय कराल? विनाकारण होणारा त्रास पाहत बसाल? लाखो लोकांजवळ करण्यासारखे काहीही उरले नाही.समाजाने विकासाचे सर्व विकल्प त्याच्याकडून घेऊन टाकले आहेत.ते एका जागी अडकून पडले आहेत.आणि त्यातून बाहेर पडण्याचा काहीही उपाय नाही.ते एका बंद वस्तीत आले आहेत, जिथून बाहेर पडण्याचा मार्ग नाही.आणि तुम्ही जेवढे प्रतिभावान असाल तेवढ्या लवकर अशा बंद ठिकाणी पोचाल.आणि तेव्हा तुम्ही काय कराल? समाज तुम्हाला कुठलाही विकल्प देत नाही कारण समाज वैकल्पिक समाजाचा स्वीकार करत नाही.आत्महत्येचे आणखी एक महत्त्व आहे,ते पण समजावून सांगण्यासारखे आहे.जीवनात सर्वकाही एकसारखे किंवा बरोबरीचे आहे.तुम्ही अशी कार बाळगू शकत नाही जी दुसऱ्या जवळ नाही.लाखो लोकांजवळ तशीच कार आहे जी तुमच्याजवळ आहे.लाखो लोक तसेच जीवन जगत आहेत जसे जीवन तुम्ही जगत आहात.तोच चित्रपट पाहत आहेत, तेच वर्तमानपत्र वाचत आहेत, जे तुम्ही वाचत आहात.जीवन खूप कॉमन आहे.तुमच्यासाठी नवीन काही अद्वितीय असे जगण्यासारखे किंवा करण्यासारखे शिल्लक राहिलेले नाही.आत्महत्या अद्वितीय घटना आहे.फक्त तुम्ही स्वतःसाठी मरू शकता.तुमच्यासाठी इतर कुणी मरू शकत नाही.तुमचा मृत्यू हा केवळ तुमचा मृत्यू असेल,कुण्या दुसऱ्याचा नाही.मृत्यू अद्वितीय आहे.या तथ्याकडे पहा.मृत्यू अद्वितीय गोष्ट आहे,ती तुम्हाला अद्वितीय बनवते.ती तुम्हाला वैयक्तिकता देते.समाजाने तुमची वैयक्तिकता घेऊन टाकली आहे.तुम्ही फक्त चक्राची एक कडी आहात ज्याला बदलले जाऊ शकते.जेव्हा तुम्ही मराल तेव्हा तुम्हाला कोणीही आठवण ठेवणार नाही.तुमचे स्थान कुणी दुसरा  घेऊन टाकेल.तुम्ही जर एखाद्या विश्वविद्यालयात प्राध्यापक आहात तर तुमची जागा कोणी दुसरा घेऊन टाकेल.कोणी दुसरा तुमच्या जागी विद्यापीठातील प्राध्यापक होईल.जर तुम्ही देशाचे राष्ट्रपती असाल, तरी ज्या क्षणी तुम्ही निरोप घ्याल त्या क्षणी दुसरा कोणीतरी तुमच्या जागी देशाचा राष्ट्रपती होऊन जाईल.तुमचे स्थान कुणी दुसरा घेऊ शकतो.याचा त्रास होतो की तुमचे काहीही मूल्य नाही,की तुमची कमतरता कुणाला जाणवणार नाही,तुम्ही समाप्त व्हाल आणि त्वरित तेही लोक समाप्त होतील जे तुम्हाला जाणत होते.तेव्हा जवळजवळ असे होईल की तुम्ही कधी झालाच नाहीत.तुम्ही त्या दिवसाच्या बाबतीत विचार करा. हो ,काही दिवस लोक तुमची आठवण काढतील.तुमच्या प्रियकराला किंवा प्रेयसीला तुमची आठवण येईल,तुमची मुले तुम्हाला लक्षात ठेवतील,कदाचित काही मित्रही.हळूहळू त्यांची ही स्मृती अंधुक, मंद होत जाईल आणि नंतर समाप्त.पण त्या लोकांच्या जिवंत असेपर्यंत ज्या लोकांची तुमची काही आत्मियता होती, तुमची आठवण त्यांना कधी कधी येत जाईल पण एकदा ते सर्व लोक जगातून निघून गेले तेव्हा तुम्ही नेहमीसाठी समाप्त होऊन जाल.जसे की तुम्ही इथे कधी झालाच नव्हता.तेव्हा या गोष्टीने काहीही फरक पडत नाही की तुम्ही इथे झाला होता की नव्हता. जीवन तुम्हाला अद्वितीय सन्मान देत नाही.ही गोष्ट खूप  सलते.मृत्यू कमीत कमी अद्वितीय आहे, आणि आत्महत्या मृत्यूपेक्षा अद्वितीय आहे  कारण मृत्यू अशी गोष्ट आहे ,जी येते आणि आत्महत्या अशी गोष्ट आहे जी तुम्ही करता.मृत्यू तुमच्या हाताच्या बाहेरची गोष्ट आहे.जेव्हा तो येईल तेव्हा येईल .पण आत्महत्या तुम्ही करू शकता.तुम्ही शिकार नाहीयेत.आत्महत्या तुम्ही करू शकता.मृत्यू समोर तुम्ही शिकार आहात,आत्महत्या तुमच्या नियंत्रणात आहे.जन्म आधीच झालेला आहे.त्याच्यासोबत तुम्ही काही करू शकत नाही, आणि जन्मण्यापूर्वीही तुम्ही त्याच्यासाठी काही केलेले नाही. ती फक्त एक दुर्घटना होती.जीवनात तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, जन्म प्रेम आणि मृत्यू.जन्म होऊन गेला, त्याच्या बाबतीत आता काही केले जाऊ शकत नाही.जन्मण्यापूर्वी तुम्हाला हे विचारलेही गेले नाही की तुम्हाला जन्मण्याची इच्छा आहे किंवा नाही.तुम्ही शिकार झालात.प्रेम पण होऊन जाते, तुम्ही त्याच्यासाठी काही करू शकत नाही.तुम्ही असहाय्य असता.एक दिवस तुम्ही कुणाच्या प्रेमात पडून जाल.तुम्ही यासाठी काहीही करू शकत नाही.तुम्हाला कुणाच्या प्रेमात पडावयाचे असेल तर ते तुमच्या हातात नाही.ते असंभव आहे.आणि जेव्हा तुम्ही कुणाच्या प्रेमात पडता तेव्हा त्यातून स्वतःला दूर खेचणेही तुम्हाला कठीण जाते.जन्म होतो, तसेच ते प्रेमाच्या बाबतीतही सत्य आहे.आता केवळ मृत्यूच उरला ज्याबाबत तुम्ही काही करू शकता.तुम्ही त्याची शिकार होऊ शकता, किंवा तुम्ही स्वतः निश्चित करू शकता.आत्महत्या अशी गोष्ट आहे जी निश्चित केली गेली आहे, ठरवली गेली आहे.कुणीतरी म्हणतो , की कमीत कमी  मला एक तरी गोष्ट करू द्या,जिथे मी फक्त एक दुर्घटना होतो.मी आत्महत्या करेन.कमीत कमी इथे एक तरी गोष्ट आहे जी मी करू शकतो.जन्माच्या बाबतीत काहीही करणे संभव नाही.जर प्रेम नसेल तर ते निर्माण केले जाऊ शकत नाही.मृत्यू सोबत विकल्प आहे.एक तर तुम्ही त्याची शिकार होऊ शकता, किंवा निर्णय घेऊ शकता.या समाजाने तुमची सारी गरिमा, सारा सन्मान घेऊन टाकला आहे.यामुळे लोक आत्महत्या करतात,कारण त्यांची आत्महत्या त्यांना एक गरिमा प्राप्त करून देते.ते अस्तित्वाला म्हणू शकतात,मी तुझ्या जगाचा आणि तुझ्या जीवनाचा त्याग केला आहे,ते काहीही कामाचे नव्हते.जे लोक आत्महत्या करतात ते त्या लोकांपेक्षा जास्त संवेदनशील असतात जे लोक जगत राहतात, ओढले जात असतात.आणि मी म्हणत नाही, की आत्महत्या करून टाका.मी हे म्हणत आहे,की इथे उच्च संभावना आहेत.जीवनाचा प्रत्येक क्षण एवढा सुंदर,वैयक्तिक,अद्वितीय,नवीन होऊ शकतो.प्रत्येक क्षण खूप मौल्यवान होऊ शकतो.तेव्हा आत्महत्येची आवश्यकता राहत नाही.प्रत्येक क्षण एवढी धन्यता आणू शकतो, प्रत्येक क्षण तुम्हाला एवढे अद्वितीय बनवू शकतो.कारण तुम्ही अद्वितीय आहातच.तुमच्यासारखा व्यक्ती यापूर्वी कधी झाला नाही आणि यापुढेही कधी होणार नाही.पण समाज तुम्हाला मोठ्या फौजेचा भाग बनवत असतो.समाजाला कधीही असा व्यक्ती नको असतो जो स्वतःच्या मार्गावर चालत असतो.समाज तुम्हाला गर्दीचा भाग बनवून इच्छितो. हिंदू व्हा,ख्रिश्चन व्हा, यहुदी   व्हा,अमेरिकन व्हा, भारतीय व्हा, बस गर्दीचा हिस्सा होऊन जा.कोणत्याही गर्दीचा,पण गर्दीचा हिस्सा व्हा.कधीही तुम्ही स्वयं होऊ नका.आणि जे गर्दीचा हिस्सा होऊ इच्छित नाहीत, गर्दी पासून वेगळे राहण्याची ज्यांची इच्छा आहे, ते लोक या पृथ्वीवरील मीठ आहेत.जे गर्दी सोबत उभे राहत नाहीत, ते पृथ्वीवरील सर्वात मूल्यवान लोक आहेत.पृथ्वी या थोड्याशा मूल्यवान लोकांमुळे सुगंधित आणि गरिमा पूर्ण आहे, आणि ते आत्महत्या करतात.ध्यान आणि आत्महत्या हे पर्याय आहेत.हा माझा अनुभव आहे.जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी येऊन पोहोचता, जिथे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, तेव्हा तुम्ही ध्यानासाठी पूर्ण तयार झालेले असता. ध्यानाचा अर्थ आहे की तुम्ही पूर्णपणे आपल्या वैयक्तिकतेची घोषणा करता.मी माझे जीवन स्वतःच्या पद्धतीने जगेल, मी कुणाची नक्कल करणार नाही.मी मशीन प्रमाणे, रोबोट प्रमाणे कार्य करणार नाही.माझा कुणीही आदर्श नसेल आणि माझे कोणतेही लक्ष  नसेल.मी त्या त्या क्षणात जगेल, मी नैसर्गिक जगेल आणि त्याच्यासाठी पूर्ण जोखीम  घेईन.प्रतिभावान लोक आत्महत्या करतात,आणि जे प्रतिभावानापेक्षा प्रतिभावान आहेत ते लोक ध्यानात उतरतात.ते जीवनाला अर्थ द्यायला सुरुवात करतात, ते जीवनाला महत्त्व देणे सुरू करतात, ते जगणे सुरू करतात.हा अवसर, ही संधी का सोडावी? 

              ओशो द हार्ट सूत्र.

अनुवाद: प्रा.महेंद्र देशमुख.मो.क्र.90 966 94 200.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25