ओशो वाणी भाग 6

 ओशो वाणी भाग 6.ओशो वाणी भाग 6                              जे सहज घडत असेल, तेच कर्तव्य आहे. जे जबरदस्तीने करावे लागेल, तेच अकर्तव्य आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण तुमची परिभाषा अगदी उलट आहे. तुम्ही तर कर्तव्य त्यालाच म्हणता, जे नाईलाजाने करावे लागत आहे. बाप आजारी आहे, पाय दाबावे लागत आहेत, तुम्ही म्हणता, कर्तव्य करीत आहोत.. याचा अर्थ असा आहे की मरा तरी, किँवा बरे तरी व्हा, कर्तव्य करून घेऊ नका. आता हे कोणत्या पापांचे फळ भोगावे लागते आहे की आता सिनेमा पहायला गेलो असतो, की क्लबमध्ये नाच होत असता, की रोटरीची बैठक होत आहे.. आणि आता हे बापाचे पाय दाबावे लागत आहेत. कुणी सांगितले होते आम्हाला जन्म द्यायला? हे सर्व विचार मनात उठत आहेत. कर्तव्याचा अर्थ तुम्हाला समजतो? कर्तव्याचा अर्थ आहे: जे तुम्हाला करायची इच्छा नव्हती आणि करावे लागत आहे. तुम्ही एखाद्या स्त्रीच्या प्रेमात पडता, तेंव्हा तर तुम्ही हे म्हणत नाही की हे कर्तव्य आहे. तेव्हा तुम्ही म्हणता, हे प्रेम आहे. पण जेव्हा तुम्ही आईला पहायला जाता, तेव्हा म्हणता, कर्तव्य आहे. तुम्ही आपल्या प्रेयसीला भेटायला जाता, तेंव्हा म्हणत नाही की कर्तव्य, पण जेव्हा घरी पत्नीला भेटण्यासाठी परतता, तेंव्हा म्हणता, कर्तव्य आहे, जे करावे लागते. कर्तव्याचा अर्थच आहे: करायचे नव्हते,तरी करावे लागले. हृदया पासून केले नाही.. हे काय कर्तव्य आहे? तुमचा ' कर्तव्य' हा शब्दच घाणेरडा आहे. मी तुम्हाला सांगेन- तेच करा, जे सहज आहे, धोका देऊ नका. जर बापाचे पाय दाबायचे नसतील, तर क्षमा मागा, स्पष्ट सांगा की मनापासून भाव उठत नाही, खोटे करणार नाही. मनात भाव असेल, तरच पाय चेपा. मी सांगतो, वडिलांनाही आनंद होईल. हा माझा अनुभव आहे की तुम्ही जबरदस्तीने पाय दाबत असाल, तर वडिलांना आनंद होणार नाही. तुमच्या हातातील ऊर्जा, तरंग याद्वारे त्यांना जाणवेल की तुम्ही जबरदस्तीने कर्तव्य पार पाडत आहात. ना तुम्ही प्रसन्न आहात, ना वडील प्रसन्न आहेत. ना तुम्ही आनंदित आहात, ना तुम्ही वडिलांना आनंदित करु शकता. जी गोष्ट आनंदातून जन्मत नाही, ती आनंद जन्माला घालू ही शकत नाही. आनंदाने वाहणाऱ्या धारेतूनच आनंद निर्माण होतो. तर तुम्ही स्पष्ट सांगून द्या. आत एक, बाहेर एक असे करु नका. बाहेरून तर पाय दाबत आहात, आणि मनात काही वेगळाच विचार चालू आहे, विपरीत विचार करीत आहात, क्रोधित होत आहात, विचार करीत आहात की वेळ वाया गेला. विश्रांती घेतली असती, ती गेली. पण तुम्ही स्वतःशी खोटे वागत आहात आणि पित्या समोरही खरे नाहीत. मी म्हणत नाही की असे कर्तव्य करा. मी म्हणतो, तुम्ही क्षमा मागा. म्हणा की मला माफ करा. जे सुखद, प्रीतिकर आहे, तेच कर्तव्य. जे प्रितीकर नाही, सुखद नाही, तेच अकर्तव्य. तुम्हाला उलटे शिकवले आहे की प्रितिकर- अप्रितीकर चे काही नाही, सहज- असहज चा काही प्रश्न नाही.. दुसऱ्यांना जसे आवडते, तसे केले तर कर्तव्य, तुम्हाला जसे वाटते, तसे वागले तरअकर्तव्य. म्हणून प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यांच्या मर्जीने वागत आहे. म्हणून तर खूप कमी लोक जगत आहेत. अधिक लोक तर मेल्या प्रमाणे आहेत, जगतच नाही आहेत. ही काय जगण्याची पद्धत आहे? दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात जीवन व्यतीत करत आहात, मग सुगंध कसा येईल? संगीताचा जन्म कसा होईल? तुम्ही नाचताल कसे? सदैव दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत आहात. ना तुम्ही प्रसन्न आहात, ना ते प्रसन्न आहेत, सारे जग उदास होऊन गेले आहे. नाही, हीच माझी मौलिक क्रांति आहे जी मी तुम्हाला देऊ इच्छितो. तुम्ही तेच करा, ज्यात तुम्हाला आनंद मिळेल, कुठल्याही किमतीवर. तुम्हाला ज्यातून आनंद मिळत नाही, ते तुम्ही करू नका, मग त्याची कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. तुम्हाला अखेर लक्षात येईल की तुम्ही जिंकलात, हरला नाहीत. सुरुवातीला लोकांना त्रास होईल, कारण त्याच्या सवयी तुम्ही खराब केल्या आहेत, समाज विकृत झाला आहे म्हणून. पण हळूहळू तुमची प्रामाणिकता त्यांच्या लक्षात येईल. त्यांच्या लक्षात येईल की तुम्ही विश्वासपात्र आहात कारण तुम्ही प्रामाणिक आहात. सत्य अंततः कुणालाही नुकसान पोचवत नाही. सुरुवातीला अनेक वेळा वाटेल की नुकसान पोचू शकते. असत्य होऊ नका आणि मनातल्या भावनांना खोटे पाडू नका. जर तुम्ही त्यांना खोटे पाडत असाल तर हळूहळू तुम्ही खोट्याचा एक संग्रह होऊन जाल, ज्यातून जीवनाची आग हरवून गेली असेल, फक्त राखच राख शिल्लक असेल. आणि जर तुम्ही सहज बनत असाल, तर तुमच्या अचानक लक्षात येईल की, परमात्म्याचा शोध घेण्यासाठी काहीही करावे लागत नाही. तुमच्या सहजतेच्या झरोक्यातूनच एखाद्या दिवशी परमात्मा आत येतो, कारण परमात्मा म्हणजेच सहजता.     प्रा. महेन्द्र देशमुख 9096694200.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25