ओशो वाणी भाग 22

 ओशो वाणी भाग,22.                        तिबेट मध्ये एक फकीर होता, मिलारेपा.एक व्यक्ती येऊन त्याला म्हणाला,"मला काही सिद्धी प्राप्त करायची आहे, मला काही मंत्र द्या." त्याने खूप समजावले की माझ्याकडे कुठलाही मंत्र नाही. खूप समजावले की मंत्र असेल कुणापाशी तरी व्यर्थ आहे. मंत्र कुठेही नेत नाही. नासमज लोक मंत्र घेतात त्यामुळे जे खूप धूर्त आहेत ,ते मंत्र द्यायला लागतात. कोणता मंत्र कुठे नेत नाही.जे आमच्यामधील खूप चलाख आहेत,धूर्त आहेत ते मंत्र द्यायला लागतात, कारण मूर्ख लोक मंत्र घेण्यासाठी उत्सुक असतात. कारण त्यांना असे वाटते की याने काही होऊन जाईल.तो म्हणाला,"मंत्रा बिंत्राने काही होणार नाही, कधी काही झाले नाही. सर्व मंत्र मनुष्याने शोधून काढले आहेत, म्हणून परमात्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग बनू नाही शकत."पण तो ऐकायला तयार नव्हता, म्हणून त्या फकिराने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी कागदावर एक  मंत्र लिहून त्याला दिला आणि सांगितले, "हे घेऊन जा आणि रात्री आंघोळ करून या मंत्राचा 5 वेळेस पाठ कर.,तुझी जी इच्छा असेल ती पूर्ण होऊन जाईल."तो माणूस तिथून पळाला.आभार मानायचे ही विसरला की या फकिराचे आभार मानले पाहिजेतज्या गोष्टीचे प्रयोजन होते,ते पूर्ण झाले होते.आता धन्यवाद कोण देतो? तो अजून पायऱ्या उतरला ही नव्हता,तेवढ्यात फकीर म्हणाला की," मित्रा, एक गोष्ट तुला सांगणे मी विसरुनच गेलो.मंत्र तर वाच पण मंत्र वाचताना माकडाचे स्मरण ,करू नकोस." तो माणूस म्हणाला,"काळजी करू नका, एवढे आयुष्य जगलो पण आज पर्यंत कधी माकडाची आठवण आली नाही,आज कशासाठी येईल?" पण तो अजून ूर्ण पायर्‍याही उतरू शकला नव्हता, की माकडाचे स्मरण यायला सुरुवात झाली.मनात माकडे मान हलवू लागली. डोळे मिटून घेतले तरी माकडे दिसू लागली. खूप घाबरला. जसा जसा घराच्या जवळ पोहोचू लागला, मनात माकडाची गर्दी वाढू लागली.डोळे बंद केले,तर रांगेत उभी राहिलेली माकडे हसत होती, त्याला चिडवत होती.तो तर खूप घाबरला. हे तर मोठे संकटच झाले. आणि या माकडांशी माझा कधीच काही संबंध नव्हता, आज हे काय झाले? रोज घरी जाऊन स्मरण करत होतो, देवाचे नाव घेत होतो,मान झुकवत होतो, डोळे बंद करत होतो. पण आज काहीही करून काही फरक पडला नाही. माकडांची संख्या वाढत गेली. मध्यरात्र होईपर्यंत त्या माणसाच्या मनात माकडेच माकडे होती .तिथं दुसरं कुणीही नव्हतं . मंत्र वाचणे ही कठीण झाले. सकाळ पर्यंत तर तो माणूस पार थकून गेला. त्याने जाऊन तो मंत्र साधूला परत दिला, आणि म्हणाला ," महाराज, जर दुसऱ्या कुणाला हा मंत्र देत असाल, तर कृपा करून ही अट, ही कंडिशन घालू नका. माझ्या आयुष्यात कधी मी माकडाचे स्मरण केले नाही.आज एका रात्रीतच हैराण होऊन गेलो. आणि आता या जन्मी या मंत्राच्या सिद्ध होण्याची कुठलीही संभावना नाही. आता पुढच्या जन्मी पाहू. पण एका अटीवर पुढच्या जन्मात हे सांगू नका,की मंत्र म्हणताना माकडाचे स्मरण करणे निषिद्ध आहे.ज्या गोष्टींना आपण मनातून जबरदस्तीने हटवायला पाहतो त्या गोष्टी आमंत्रित होतात .हाच  चित्ताचा सहज नियम आहे. आणि ज्या गोष्टीवर आपण आपले चित्त जबरदस्तीने लावू इच्छितो, त्या चित्तातून दूर दूर सरकतात. हा दुसरा नियम आहे.हे दोन्ही नियम एकाच नियमाच्या,एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या गोष्टीवर तुम्ही चित्त जबरदस्तीने लावू पाहता त्या गोष्टीपासून चित्त पळ काढेल आणि ज्या गोष्टीवरून तुम्ही जबरदस्तीने चित्त हटवायला पाहता, त्या गोष्टी कडे चित्त वेधले जाईल .आणि या गोंधळात जो पडतो,  या वेडेपणात जो फसतो, तो फक्त थकून जातो आणि नष्ट होऊन जातो आणि कुठेही पोचू शकत नाही. त्यामूळे मी कुठल्याही गोष्टीवर चित्त लावण्यासाठी सांगत नाहीये, आणि कुठल्या गोष्टीवरून चित्त हटवायलाही सांगत नाही. मी तर हे सांगत आहे, की जे काही करत आहात, जीवन तर चारी बाजूंना आहे, जे जीवन चारी बाजूंना वाहत आहे, त्या संपूर्ण जीवनाप्रति जागरूक व्हा. काही हटवू नका, आणि कशाला आमंत्रण देऊ नका. चांगल्या आणि वाईट विचारां मध्ये निवड करु नका. चांगल्या विचारां प्रति ही सजग रहा आणि वाईट विचारांप्रति ही सजग रहा. लक्षात ठेवा की जागे राहण्याचा अर्थ आहे की मी आतून सजगतेने भरलेला आहे. माझ्या चित्तातून कुठलीही गोष्ट बेहोशितून निघू नये. काहिही आले, कुणीही आले, तरी मी जागृत पणे त्याला पाहील. जसे कुणी घरासमोर पहारेकरी बसवतो, तो पहारेकरी पहात राहतो की कोण आले, कोण गेले. तसे आपल्या चित्ताला पहारेकरी बनवा, वॉचमन बनवा. आणि जसे जसे चित्त या पहारा करण्यात समर्थ होत जाईल, तूम्ही हैराण होऊन जाल. ना चांगले विचार येतील, ना वाईट विचार येतील. दोन्ही निघून जातील. कारण वाईट विचार यासाठी येत होते की तूम्ही त्याला हटवत होता. चांगले विचार यासाठी थांबत नव्हते कारण तुम्ही त्यांनी थांबावं म्हणून प्रयत्न करीत होता. पण जेव्हा तूम्ही दोन्ही गोष्टी सोडून दिल्या आणि मनात चांगल्या आणि वाईटा प्रति कोणताही भाव ठेवला नाही, फक्त साक्षी होऊन गेलात, तर त्यांच्या येण्याचेआणि थांबण्याचे काही कारण राहिले नाही. ते आपोआप निघून जातील. आणि तेव्हा तर जी चित्ताची स्थिती बनेल, तेच धार्मिक चित्त आहे, तेच जागृत चित्त आहे.      प्रा. महेन्द्र देशमुख,9096694200

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25