ओशो वाणी भाग 23

 ओशो वाणी भाग 23.                        तुम्ही सतत स्वप्न पहात असता. रात्रीच नव्हे,तर संपूर्ण दिवसही स्वप्न पहात असता. हे पहिल्यांदा समजून घेण्याची गरज आहे की जागृत अवस्थेतही तुम्ही स्वप्न पाहत असता. दिवसा एखादेवेळी डोळे बंद करा, शरीराला थोडे शिथिल करा,आणि दिसेल की स्वप्न चालू आहे. ते कधीच बंद होत नाही.आमचे दैनंदिन कामकाज चालत असल्याने ते फक्त दबून राहते. हे दिवसाच्या ताऱ्या सारखे आहे .रात्री तुम्ही ताऱ्यांना पाहता,दिवसा पाहत नाही. तारे सदा असतात .दिवसा सूर्याच्या प्रकाशात फक्त लपून  जातात.तुम्ही एका खूप खोल विहिरीत उतरलात तर तुम्हाला दिवसाही आकाशातील तारे दिसतील. तारे पाहण्यासाठी अंधाराची गरज आहे.त्यामुळे एका विहिरीत उतरा आणि त्याच्या गोलाईतून वर पहा, तुम्हाला दिवसाही तारे दिसतील.तारे तिथेच आहेत.असे नाही की रात्रीचे ते तिथे असतात, आणि दिवसा नसतात. रात्री तुम्ही त्यांना सहजपणे पाहू शकता.दिवसा ते दिसू शकत नाहीत कारण सूर्याचा प्रकाश बाधा बनतो. हीच गोष्ट स्वप्नांच्या बाबतीतही खरी आहे असे नाही की तुम्ही झोपेतच स्वप्न पहात असता. झोपेत स्वप्ने सहजपणे अनुभवता येतात, कारण त्यावेळी दिवसाचा कार्यकलाप बंद असतो. त्यामुळे स्वप्नाचा अंतरंगी कार्य कलाप पाहिला आणि अनुभवला जाऊ शकतो. तुम्ही सकाळी जागे होता तेव्हाही स्वप्न चालूच राहते. फक्त तुम्ही बाहेरच्या कामांमध्ये व्यस्त होऊन जाता. दैनंदिन कामकाज तुमच्या स्वप्नांना दाबून टाकते, पण आत मध्ये स्वप्न चालूच राहते. आरामखुर्चीत बसून शरीराला शिथिल करा,डोळे बंद करा आणि अचानक तुम्ही  पहाल की स्वप्नातले तारे तिथेच हजर आहेत, ते कुठेही गेले नाहीत.स्वप्नसुद्धा चालू राहते. ही एक सतत प्रक्रिया आहे. दुसरी गोष्ट,जर स्वप्न चालू असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही जागे नाही. तुम्ही झोपलेले आहात.फरक एवढाच आहे की रात्री तुम्ही जास्त झोपलेले असता, आणि दिवसा थोडे कमी. हा फरक सापेक्ष आहे.तर,जर स्वप्न चालूच असेल तर तुम्ही जागे आहेत असे म्हणता येणार नाही. स्वप्न एक आवरण निर्माण करते आणि ते आवरण धुक्या प्रमाणे तुम्हाला वेढून घेते.त्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्वप्न पाहत असता, तुम्ही जागे नाही, दिवस असो की रात्र. यामुळे दुसरी गोष्ट ही आहे की स्वप्न बिलकुल अस्तित्वात नाही ,तेव्हाच तुम्ही जागे आहात असे म्हटले जाऊ शकते. आपण बुद्धाला जागृत पुरुष म्हणतो. हे जागरण काय आहे? हे जागरण वस्तुतः आंतरिक स्वप्न प्रक्रियेचे विसर्जन आहे.आत कुठलेही स्वप्न नाही. तुम्ही आत प्रवेश करता, तर तिथे कुठलेही स्वप्न भेटत नाही.जणू आकाशामध्ये तारे राहिलेच नाहीत, शुद्ध आकाशच आहे. जेव्हा स्वप्न राहिले नाही तर तुम्ही शुध्दआकाश आहेत. ही शुद्धता,ही निर्दोषता,हे स्वप्न रहित चैतन्य, यालाच बुद्धत्व किंवा जागरण असे म्हणतात. अनेक युगांपासून संपूर्ण जगातील अध्यात्म, मग ते पूर्वेचे असेल की पश्चिमेचे,सांगत आले आहे की मनुष्य झोपलेला आहे. जीजस म्हणतात, बुद्ध सांगतात, उपनिषद म्हणतात, की मनुष्य झोपेत आहे.यामुळे तुलनात्मक रूपाने रात्री तुम्ही जास्त झोपलेला आहात आणि दिवसा थोडे कमी. पण अध्यात्म सांगते की माणूस झोपेत आहे. ही गोष्ट नीट समजून घ्यावी लागेल. याचा काय अर्थ आहे? या युगात गुर्जिएफ ने या तथ्यावर सर्वाधिक जोर दिला आहे की मनुष्य झोपेत आहे. त्याने तर येथपर्यंत सांगितले आहे की माणूसच एक प्रकारची झोप आहे. प्रत्येक माणूस गाढ झोपेत आहे.असे म्हणायचे काय कारण आहे?तुम्हाला माहित नाही, तुम्हाला स्मरण नाही, की तुम्ही कोण आहात? काय तुम्हाला माहित आहे की तुम्ही कोण आहेत? जर रस्त्यात चालताना तुम्हाला एखादा व्यक्ती भेटला आणि तुम्ही त्या व्यक्तीला विचारले की तुम्ही कोण आहेत ?आणि जर तो उत्तर देऊ शकत नसेल तर तुम्हाला काय वाटेल? तुम्ही विचार कराल की एक तर तो वेडा आहे, नशेत आहे,किंवा झोपलेला आहे.जर तो हे सांगू शकत नसेल की तो कोण आहे तर तुम्ही त्याच्या बाबतीत काय विचार कराल? धर्माच्या मार्गावर सर्वांची हीच अवस्था आहे.तुम्ही सांगू शकत नाही की मी कोण आहे? तुम्ही स्वतःच्या बाबतीत जागरूक नाहीत. तुमची स्वतःशी कधीही भेट झालेली नाही. विषयगत संसाराच्या बाबतीत तर तुम्हाला खूप माहिती आहे,पण तुम्ही स्वयम् विषयी जाणत नाही.तुमच्या मनाची ही अवस्था आहे की जणू तुम्ही चित्रपट पाहायला गेला आहात, पडद्यावर चित्रपट चालू आहे,आणि तुम्ही तो पाहण्यात एवढे तल्लीन झाला आहात की तुम्हाला त्या चित्रपटाशिवाय,  चित्रपटाच्या कथेशिवाय  इतर कशाचेही भान नाही. त्यावेळेस जर कुणी तुम्हाला विचारले, की तुम्ही कोण आहात तर तुम्ही काहीही सांगू शकणार नाही. स्वप्नही चित्रपटासारखे आहे.ठीक चित्रपटासारखे आहे.जगाला प्रतिबिंबित करते.मनाच्या दर्पणात जग प्रतिबिंबित होते, तेच स्वप्न आहे. आणि तुम्ही त्यात याप्रकारे बुडालेले आहात, त्याच्याशी एवढे एकात्म झालेले आहात, की तुम्ही विसरूनच गेला आहात की तुम्ही कोण आहात? झोपलेले असण्याचा हाच अर्थ आहे की स्वप्न पाहणारा स्वप्नात हरवून गेला आहे. स्वतःला सोडून तुम्ही इतर सर्व काही पहात असता, स्वतःला सोडून सर्व काही अनुभव करता, स्वतःला सोडून सर्वकाही जाणता. हेच आत्म अज्ञान म्हणजे झोप आहे.आणि जोपर्यंत ही स्वप्न क्रिया पूर्णपणे संपत नाही, तुम्ही स्वयम् च्या प्रति जागू शकत नाही. तुम्ही पाहिले असेल की तीन तासापर्यंत चित्रपट पहात राहिल्यावर जेव्हा त्याचा अचानक अंत येतो, तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये परत येता. तेव्हा तुमच्या लक्षात येते कि तीन तास निघून गेले. तेव्हा लक्षात येते कि हा तर चित्रपट होता. मग तुमच्या लक्षात येते की तुम्ही रडत होता, कारण चित्रपट दुःखांत होता, किंवा हसत होता,किंवा काही दुसरे करत होता. आणि तेव्हा तुम्हाला आपल्या मूर्खपणावर हसू येते की हा केवळ चित्रपट होता गोष्ट होती की,पडद्यावर काहीही नव्हते, फक्त प्रकाश आणि छाया यांचा एक खेळ होता,विजेचा खेळ होता.आता तुम्ही हसता आता तुम्ही स्वयम् मध्ये परतला आहात .पण तीन तास तुम्ही कुठे होता? तुम्ही आपल्या केंद्रावर नव्हता. तुम्ही बिलकुल परिघावर पोहोचला होता. तेव्हा तुम्ही तिथे होता जिथे चित्रपट चालू होता. तुम्ही आपल्या केंद्रावर नव्हता. तुम्ही स्वतः सोबत नव्हता  तुम्ही कुठे दुसऱ्या जागी होता. हेच स्वप्नात घडत असते,आणि हेच आपले आयुष्य आहे.चित्रपटाची घटना तर फक्त तीन तासांची आहे,पण स्वप्न क्रिया अनेक जन्मा पर्यंत चालू राहते. आणि जर अचानक स्वप्न बंदही झाले तरी तुम्हाला हे लक्षात येणार नाही की तुम्ही कोण आहेत. अचानक तुम्हाला सगळीकडे अंधुक अंधुक दिसायला लागेल,आणि तुम्ही भयभीत व्हाल. तुम्ही पुन्हा चित्रपटामध्ये, चित्रपटगृहांमध्ये परत जाऊ पहाल कारण ती जागा तुम्हाला परिचित आहे. तुम्ही त्याच्याशी चांगल्या प्रकारे परिचित आहात , समायोजित आहात कारण जेव्हा स्वप्न  तिरोहित होते,तेव्हा एक मार्ग उघडतो, विशेष करून झेन मध्ये त्याला त्वरित मार्ग, त्वरित बुद्धत्वाचा मार्ग असे म्हणतात.              प्रा. महेन्द्र देशमुख,9096694200.

Comments

Popular posts from this blog

ओशो वाणी भाग 29.

ओशो वाणी: भाग 30.

ओशो वाणी भाग 25